१. भारताची लोकसंख्या: जनगणना २०११ प्रमुख आकडेवारी
भारतात पहिली बिगर-अधिकृत जनगणना १८७२ मध्ये (लॉर्ड मेयोच्या काळात) झाली, तर पहिली अधिकृत व नियमित जनगणना १८८१ पासून (लॉर्ड रिपनच्या काळात) सुरू झाली. २०११ ची जनगणना ही भारतातील १५ वी आणि स्वातंत्र्यानंतरची ७ वी जनगणना होती.
- एकूण लोकसंख्या: १२१.०८ कोटी (१,२१०,८५४,९७७) – पुरुष: ५१.५४%, स्त्रिया: ४८.४६%
- जागतिक वाटा: जगाच्या एकूण भूभागापैकी भारताकडे केवळ २.४% जमीन आहे, परंतु जगाच्या एकूण लोकसंख्येच्या १७.५% लोकसंख्य भारतात राहते.
- दशवार्षिक वाढ दर (२००१-२०११): १७.७% (वार्षिक वाढ दर १.६४%)
२. लोकसंख्येचे वितरण आणि घनता (Population Distribution & Density)
अ) सर्वाधिक व सर्वात कमी लोकसंख्येची राज्ये
- सर्वाधिक लोकसंख्या असणारी राज्ये (उतरता क्रम):
- उत्तर प्रदेश – १९.९८ कोटी (१६.५१%)
- महाराष्ट्र – ११.२४ कोटी (९.२८%)
- बिहार – १०.४१ कोटी (८.६०%)
- पश्चिम बंगाल – ९.१३ कोटी (७.५४%)
- आंध्र प्रदेश (विभाजनापूर्वी) – ८.४५ कोटी
- सर्व्यात कमी लोकसंख्या असणारी राज्ये (चढता क्रम): सिक्किम (६.१० लाख) < मिझोराम (१०.९७ लाख) < अरुणाचल प्रदेश (१३.८३ लाख).
- केंद्रशासित प्रदेश: सर्वाधिक लोकसंख्या – दिल्ली | सर्वात कमी लोकसंख्या – लक्षद्वीप.
ब) लोकसंख्येची घनता (Density of Population)
प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रफळात राहणाऱ्या लोकांच्या सरासरी संख्येला लोकसंख्येची घनता म्हणतात.
क) भारत लोकसंख्या वाढीचे ऐतिहासिक टप्पे (१९०१ ते २०११)
- १९०१ ते १९२१ (स्थिर किंवा मंद वाढीचा टप्पा): या काळात अन्नधान्याची कमतरता, प्लेग, इन्फ्लूएंझा, पटकी यांसारख्या महामाऱ्यांमुळे मृत्यूदर खूप जास्त होता.
- १९२१ ते १९५१ (नियमित वाढीचा टप्पा): आरोग्य सुविधांमधील सुधारणांमुळे संसर्गजन्य रोगांवर काही प्रमाणात नियंत्रण आले आणि मृत्यूदर घटला.
- १९५१ ते १९८१ (लोकसंख्येचा उद्रेक / Population Explosion): स्वातंत्र्यानंतर विकासकामांना गती मिळाली, मृत्यूदरात कमालीची घट झाली परंतु जन्मदर उच्चच राहिला. (वार्षिक वाढ दर २.२% पर्यंत पोहोचला).
- १९८१ ते २०११ (घटत्या दराने वाढीचा टप्पा): साक्षरतेचा प्रसार, कुटुंब नियोजनाचे प्रबोधन आणि महिला सशक्तीकरणामुळे जन्मदरात घट होण्यास सुरुवात झाली.
३. लिंगगुणोत्तर व साक्षरता
अ) लिंगगुणोत्तर (Sex Ratio)
दर १००० पुरुषांमागे असणारी स्त्रियांची संख्या म्हणजेच लिंगगुणोत्तर होय.
- सर्वोच्च लिंगगुणोत्तर असणारी राज्ये: केरळ (१०८४), तमिळनाडू (९९६), आंध्र प्रदेश (९९३), छत्तीसगड (९९१).
- सर्वात कमी लिंगगुणोत्तर असणारी राज्ये: हरियाणा (८७९), जम्मू आणि काश्मीर (८८९), पंजाब (८९५).
- बाल लिंगगुणोत्तर (०-६ वयोगट): अरुणाचल प्रदेश (९७२) अव्वल स्थानी आहे, तर हरियाणा (८३४) तळाशी आहे.
ब) साक्षरता (Literacy Rate)
७ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या, कोणत्याही एका भाषेत लिहू व वाचू शकणाऱ्या व्यक्तीस ‘साक्षर’ मानले जाते.
- सर्वाधिक साक्षरता असणारी राज्ये: केरळ (९४.००%), मिझोराम (९१.३३%), गोवा (८७.४०%).
- सर्वात कमी साक्षरता असणारी राज्ये: बिहार (६१.८०%), अरुणाचल प्रदेश (६५.३८%), राजस्थान (६६.११%).
४. स्थलांतर (Migration) – संकल्पना आणि प्रकार
व्यक्ती किंवा जनसमूहाने एका भौगोलिक किंवा राजकीय सीमाभागातून दुसऱ्या क्षेत्रात कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या स्वरूपात राहण्याच्या उद्देशाने केलेले निवासस्थानाचे परिवर्तन म्हणजे ‘स्थलांतर’ होय. जनगणनेत ‘जन्माचे ठिकाण’ (Place of Birth) किंवा ‘शेवटच्या निवासाचे ठिकाण’ (Place of Last Residence) या दोन निकषांवरून स्थलांतर ठरवले जाते.
अ) स्थलांतराचे भौगोलिक वर्गीकरण
- आंतरराष्ट्रीय स्थलांतर (International Migration): एका देशातून दुसऱ्या देशात होणारे स्थलांतर (उदा. भारतातून उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी अमेरिकेत किंवा आखाती देशांत जाणे).
- अंतर्गत स्थलांतर (Internal Migration): देशाच्या भौगोलिक सीमांच्या आतच एका भागातून दुसऱ्या भागात होणारे स्थलांतर. याचे दोन उपप्रकार पडतात:
- अंतःराज्य स्थलांतर (Intra-state Migration): एकाच राज्याच्या एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात (उदा. बीड ते मुंबई).
- आंतरराज्य स्थलांतर (Inter-state Migration): एका राज्यातून दुसऱ्या राज्यात (उदा. उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात).
ब) स्थलांतराचे चार मुख्य प्रवाह (Migration Streams)
- ग्रामीण ते ग्रामीण (Rural to Rural): भारतात या प्रवाहात सर्वाधिक स्थलांतर होते. याचे मुख्य कारण ‘विवाह’ (Marriage) हे आहे. स्त्रियांचे सर्वाधिक स्थलांतर या प्रकारात मोडते.
- ग्रामीण ते शहरी (Rural to Urban): रोजगार, शिक्षण, आर्थिक प्रगती आणि आधुनिक जीवनशैलीसाठी होणारे हे स्थलांतर आहे. यात पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक असते.
- शहरी ते शहरी (Urban to Urban): पदोन्नती, व्यवसायाचा विस्तार किंवा जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी लहान शहरांकडून मोठ्या महानगरांकडे होणारे स्थलांतर.
- शहरी ते ग्रामीण (Urban to Rural): निवृत्तीनंतर शांत जीवनाची इच्छा, प्रदूषण किंवा आर्थिक मंदी/आपत्तीमुळे (उदा. कोविड-१९ काळातील रिव्हर्स मायग्रेशन) झालेले स्थलांतर.
क) कालावधीनुसार प्रकार
- कायमस्वरूपी (Permanent Migration): मूळ राहते ठिकाण पूर्णपणे सोडून नवीन ठिकाणी कायमचे स्थायिक होणे.
- अल्पकालीन / तात्पुरते (Temporary Migration): ठरावीक कालावधीसाठी किंवा विशिष्ट कामासाठी स्थलांतर करणे.
- हंगामी स्थलांतर (Seasonal Migration): वर्षातील विशिष्ट ऋतूत होणारे स्थलांतर. (उदा. महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचे स्थलांतर किंवा वीटभट्टी कामगार).
५. स्थलांतराची कारणे: अपकर्षण आणि आकर्षण घटक
स्थलांतराला कारणीभूत असणाऱ्या घटकांचे दोन मुख्य भागांत वर्गीकरण केले जाते:
स्त्री व पुरुषांच्या स्थलांतराची मुख्य कारणे (तुलना)
- महिलांचे स्थलांतर: भारतातील महिलांच्या स्थलांतरामागील प्रमुख आणि सर्वात मोठे कारण ‘विवाह’ (Marriage) हे आहे. एकूण स्त्री स्थलांतरापैकी सुमारे ६५-७०% स्थलांतर हे लग्नानंतर पतीच्या घरी जाण्यामुळे होते.
- पुरुषांचे स्थलांतर: पुरुषांच्या स्थलांतरामागील मुख्य कारण ‘रोजगार, नोकरी व व्यवसाय’ (Employment/Work) हे आहे. एकूण पुरुष स्थलांतरापैकी सुमारे ५०% पेक्षा जास्त स्थलांतर रोजगाराच्या शोधात होते.
६. स्थलांतराचे परिणाम (Consequences of Migration)
अ) सकारात्मक परिणाम
- आर्थिक परिणाम: स्थलांतरित व्यक्ती मूळ गावी पैसे पाठवतात (Remittances/मनीऑर्डर), ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. केरळ, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांना आंतरराष्ट्रीय व आंतरराज्य स्थलांतराचा मोठा आर्थिक फायदा होतो.
- सामाजिक परिणाम: नवीन विचारांची, तंत्रज्ञानाची व संस्कृतीची देवाणघेवाण होते. जातीभेद व संकुचित वृत्ती कमी होण्यास मदत होते.
- लोकसंख्येचा समतोल: ज्या भागात मनुष्यबळाची कमतरता असते तेथे स्थलांतरामुळे गरज भागवली जाते.
ब) नकारात्मक परिणाम
- शहरांवर पायाभूत सुविधांचा ताण: अनियंत्रित स्थलांतरामुळे मुंबई, पुणे, दिल्ली यांसारख्या शहरांमध्ये झोपडपट्ट्यांची वाढ (Slums), पिण्याच्या पाण्याची टंचाई, कचरा समस्या आणि वाहतूक कोंडी निर्माण होते.
- पर्यावरणीय समस्या: अति-नागरीकरणामुळे प्रदूषण (हवा, पाणी, ध्वनी) वाढते व नैसर्गिक संसाधनांवर अतिताण येतो.
- मूळ प्रदेशातील लोकसंख्या विकृती: ग्रामीण भागातून कार्यक्षम युवा वर्ग बाहेर पडल्यामुळे गावांमध्ये वृद्ध, लहान मुले व स्त्रिया यांचेच प्रमाण अधिक उरते (सक्षम मनुष्यबळाची कमतरता).
- ‘ब्रेन ड्रेन’ (Brain Drain): भारतातील उच्चशिक्षित डॉक्टर, अभियंते, वैज्ञानिक परदेशात स्थायिक झाल्यामुळे देशाच्या मानवी भांडवलाचे नुकसान होते.
🎯 महत्वाचे मुद्दे (Quick Revision)
- २०११ ची जनगणना: देशातील १५ वी आणि स्वातंत्र्यानंतरची ७ वी जनगणना होती.
- भारताची लोकसंख्या: १२१.०८ कोटी (जगाच्या १७.५% लोकसंख्या, भूभाग २.४%).
- महाविभाजनाचे वर्ष: १९२१ (या दशकात लोकसंख्या वाढीचा दर ऋण -०.३१% होता).
- दशवार्षिक वाढ दर: २०११ मध्ये १७.७% (सर्वाधिक वाढ दर: मेघालय २७.९%; ऋण वाढ दर: नागालँड -०.६%).
- लोकसंख्येची घनता: ३८२ प्रति चौ.किमी (सर्वाधिक: बिहार ११०६ | सर्वात कमी: अरुणाचल प्रदेश १७).
- लिंगगुणोत्तर: ९४३ (सर्वाधिक: केरळ १०८४ | सर्वात कमी: हरियाणा ८७९).
- बाल लिंगगुणोत्तर (०-६): ९१९ (सर्वाधिक: अरुणाचल प्रदेश ९७२ | सर्वात कमी: हरियाणा ८३४).
- साक्षरता दर: ७३% (पुरुष: ८०.९%, स्त्री: ६४.६% | सर्वाधिक: केरळ ९४% | सर्वात कमी: बिहार ६१.८%).
- स्थलांतराचा सर्वात मोठा प्रवाह: ग्रामीण ते ग्रामीण (Rural to Rural).
- स्त्री स्थलांतराचे मुख्य कारण: विवाह (Marriage).
- पुरुष स्थलांतराचे मुख्य कारण: रोजगार / नोकरी (Employment).
- सर्वाधिक स्थलांतरित स्वीकारणारे राज्य: महाराष्ट्र (प्रथम क्रमांक).
